Pages

Friday, February 3, 2012

सागरा, प्राण तळमळला

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी
येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थं हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला

गीत : स्वातंत्र्यवीर सावरकर
संगीत : पं. हॄदयनाथ मंगेशकर
स्वर : मंगेशकर बंधू – भगिनी

जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही

जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही तुरुंगातील स्वप्नांची अम्ही धुंडाळितो स्वप्ने वधस्तंभासवे दाही दिशांना हिंडतो आम्ही कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही दिले प्रत्येक वस्तीला अम्ही आकाश सोनेरी जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही…


-सुरेश भट

उभे भवती प्रासाद गगनभेदी पथी लोकांची होय दाट गर्दी

उभे भवती प्रासाद गगनभेदी पथी लोकांची होय दाट गर्दी प्रभादिपांची फ़ुले अंतराळी दौलतीची नित चालते दिवाळी कोप-याशी गुणगुणत अन् अभंग उभा केव्हाचा एक तो अपंग भोवतीचा अंधार जो निमाला ह्रदयी त्याच्या जणु जात आश्रयाला जीभ झालेली ओरडूनी शोश चार दिवसांचा त्यात ही उपास नयन थिजले थरथरती हात पाय रुप दैन्याचे उभे मुर्त काय ? कीव यावी पण तयाची कुणाला जात उपहासुनी पसरल्या कराला तोची येइ कुणी परतूनी मजुर बघूनी दीना त्या उभारुनी ऊर म्हणे राहीन दीन एक मी उपाशी परि लाभु दे दोन घास त्यासी खिसा ओतुनी त्या मुक्या ओन्जळीत चालू लागे तो दिनबंधू वाट आणी धनिकांची वाहने पथात जात होती ती आपुल्या मदात

हजार जिव्हा तुझ्या गर्जु द

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान जमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा? कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला “अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!”


रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष- “प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश !” आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे नाहतात मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात जगजेत्यांच्या प्रराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत ! पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास नयन झाकले असशील देवा, तूं अपुले खास; असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत !

- कुसुमाग्रज

हिमलाट पहांटे पहा जगावर आली !